नवी दिल्ली : साहित्य पुरस्कारांचे राजकारण सातत्याने चर्चेत असताना आणि गावपातळीवरील पुरस्कारांसाठीही लेखकांची चढाओढ पाहायला मिळत असताना दोन लेखिकांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार नाकारण्याचे धैर्य दाखवले आहे. आदिवासी लेखिका जेसिंता केरकेट्टा आणि भारतीय वंशाच्या लेखिका झुम्पा लाहिरी (Jhumpa Lahiri ) अशी त्यांची नावे असून आपल्या कृतीतून त्यांनी मानवतेचा आवाज बुलंद केला आहे. (Jhumpa Lahiri – Jacinta Kerketta)
Jhumpa Lahiri – Jacinta Kerketta : जेसिंता केरकेट्टा : रूम टू रीड यंग ऑथर
आदिवासी कवयित्री, लेखिका आणि स्वतंत्र पत्रकार जेसिंता केरकेट्टा (Jacinta Kerketta ) यांना लहान मुलांसाठी लिहिलेल्या ‘जिरहुल’ या कवितासंग्रहासाठी यूएस एड आणि रूम टू रीड इंडिया ट्रस्टतर्फे संयुक्तपणे ‘रूम टू रीड यंग ऑथर ऑफ २०२४’ हा पुरस्कार जाहीर झाला होता.
पॅलेस्टाईनमध्ये हजारो मुले मारली जात असताना यूएस एड आणि बोईंगशी संबंधित कोणताही पुरस्कार मी स्वीकारणार नाही, असे जेसिंता केरकेट्टा यांनी सांगितले. २०२३ मध्ये पॅलेस्टाईनमध्ये हजारो मुले आणि महिला मारल्या जात असताना, भारतातील मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी रूम टू रीड इंडिया ट्रस्टने बोईंग संस्थेसोबत सहकार्य केले होते. एकाच शस्त्राने हजारो मुले मारली जात असताना शस्त्रास्त्रांचा व्यापार आणि मुलांची चिंता एकत्र कशी चालते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
जेसिंता म्हणाल्या, “भारतात बालसाहित्यासाठी फारच कमी लेखन केले जात आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कार मिळणे हे कोणत्याही लेखकाला प्रोत्साहन ठरू शकते. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवावे लागेल की, जेव्हा मुलांसाठी चांगले जग घडवण्यात जर या लोकांचा सहभाग नसेल, तरमग या पुरस्काराचे काय करायचे? “जिरहुल” हा काव्यसंग्रह २०२४ मध्ये प्रकाशित झाला आहे. आदिवासी भागातील जंगलात असलेल्या अनेक फुलांवरच्या कविता त्यात आहेत. या कविता सामाजिक-राजकीय जाणिवेच्या आहेत.
झुम्पा लाहिरी : नोगुची संग्रहालय पुरस्कार
पॅलेस्टिनी एकतेचे प्रतीक म्हणून ‘केफीयेह’ (स्कार्फ) परिधान केलेल्या तीन कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याच्या निषेधार्थ अमेरिकेच्या नोगुची संग्रहालयाकडून पुरस्कार स्वीकारण्यास भारतीय वंशाच्या लेखिका झुम्पा लाहिरी यांनी नकार दिला आहे. १९९९ मध्ये इंटरप्रिटर ऑफ मेलडीज या लघुकथा संग्रहासाठी त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
जपानी-अमेरिकन डिझायनर आणि शिल्पकार इसामू नोगुची यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संग्रहालयाने, त्यांचे कर्मचारी त्यांच्या कामाच्या वेळेत ‘राजकीय संदेश, घोषणा किंवा चिन्हे’ असलेले कपडे किंवा उपकरणे वापरू शकत नाहीत, असे ऑगस्टमध्ये जाहीर केले होते. इसामू नोगुची पारितोषिकाची सुरुवात २०१४ मध्ये करण्यात आली होती. इसामू नोगुची प्रमाणेच, नाविन्यपूर्ण भावना, उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेसाठी वचनबद्ध असलेल्या व्यक्तिंना दरवर्षी पुरस्कार दिला जातो, असे संग्रहालयाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. या पुरस्काराच्या आधीच्या विजेत्यांमध्ये नॉर्मन फोस्टर, डेविड अडजाये, तोशिको मोरी आणि टाडाओ एंडो यांचा समावेश आहे. “आमच्या नवीन ड्रेस कोड धोरणाच्या निषेधार्थ झुम्पा लाहिरी यांनी २०२४ चा पुरस्कार नाकारला असल्याचे संग्रहालयाने एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
हेही वाचा
- भारताची तन्वी पत्री आशियाई बॅडमिंटन विजेती
- Sunita williams : सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी ‘नासा’ची मोहीम
- इस्रायलचे दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले