Home » Blog » कोल्हापूर जिल्हा : निम्म्या लढती निश्चित, कागलकडे राज्याचे लक्ष

कोल्हापूर जिल्हा : निम्म्या लढती निश्चित, कागलकडे राज्याचे लक्ष

इच्छुकांची भाऊगर्दी वाढत आहे. कुठला पठ्ठा रिंगणात उतरवायचा याची रणनीती आखली जाऊ लागली आहे.

by प्रतिनिधी
0 comments

– सतीश घाटगे,  मुख्य बातमीदार, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, शाहूवाडी-पन्हाळा आणि हातकणंगले या पाच मतदारसंघांतील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. उर्वरित पाच मतदारसंघांचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. राज्यस्तरीय नेत्यांमध्ये स्थान मिळवलेले काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांची भूमिका अनेक मतदारसंघांत महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्यापासून त्यांना निवडून आणण्यापर्यंत त्यांची भूमिका लक्षात घेतली जाणार आहे. महाडिक गटाचे खासदार धनंजय महाडिक यांचाही जिल्ह्यातील निम्म्यांहून अधिक मतदारसंघांतील प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे. राज्याचे लक्ष कागलकडे कागल विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना समरजितसिंह घाटगे हे तुतारी हाती घेऊन आव्हान देणार आहेत. मुश्रीफ यांचे पारंपरिक विरोधक समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद्चंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतल्यामुळे येथील लढत रंगतदार असेल. २०१९ च्या निवडणुकीत घाटगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढताना ८८ हजार मते मिळवली होती. या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी मुश्रीफांना पाठिंबा देऊन महाविकास आघाडीला धक्का दिला. शिवसेनेचे माजी खासदार प्रा. संजय मंडलिकही मुश्रीफांच्या सोबत राहतील. या पार्श्वभूमीवर कागलच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

कोल्हापुरात युती-आघाडी दोन्हीकडे संभ्रम
स्वातंत्र्योत्तर काळापासूनच कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघावर विरोधकांचे वर्चस्व राहिले आहे. १९८५ पर्यंत कोल्हापूर शहर हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. १९९० नंतर शिवसेनेचे वर्चस्व राहिले. गेल्या ७० वर्षात झालेल्या निवडणुकीत लालासाहेब यादव, मालोजीराजे आणि चंद्रकांत जाधव असे काँग्रेसचे तिघेच उमेदवार विजयी झाले. चंदकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या पोटनिवडणुकीत सतेज पाटील यांच्या ताकदीवर विजयी झाल्या. यंदाच्या निवडणुकीत आघाडी आणि युतीमध्ये जोरदार टक्कर होणार आहे. जागावाटपात आघाडी आणि युतीमध्ये ही जागा कोणाचा वाट्याला येणार हे महत्वाचे आहे. ‘मविआ’च्या उमेदवारासमोर माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे तगडे आव्हान असेल. क्षीरसागर सलग दोन वेळा आमदार होते. गेल्या पाच वर्षांत त्यातही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मोठा निधी आणला. भाजपकडून सत्यजित कदम यांनीही जोरदार तयारी केली आहे. शिवाय खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनीही दावा केल्यामुळे चुरस वाढली आहे. भाजपचे महेश जाधव, राहुल चिकोडे यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. महायुतीच्या जागा वाटपात कोल्हापूर उत्तरची जागा कुणाला मिळणार, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, दौलत देसाई, वसंतराव मुळीक, माजी नगरसेवक राजू लाटकर यांचीही नावे चर्चेत आहेत. राधानगरी किंवा चंदगडची जागा काँग्रेसला देऊन कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला घ्यावी, अशीही एक चर्चा सुरू झाली आहे.

‘दक्षिण’मध्ये ऋतुराज विरुद्ध महाडिक
कोल्हापूर दक्षिण मतदार संघात काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा महाडिक कुटुंबातील उमेदवाराचेच आव्हान असेल. भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक की त्यांच्या पत्नी शौमिका महाडिक उमेदवार असतील ते स्पष्ट झालेले नाही. आमदार ऋतुराज पाटील यांना त्यांचे काका आ. सतेज पाटील यांचे तर अमल महाडिक यांना खासदार धनंजय महाडिक यांचे पाठबळ असेल. येथे युती जिंकणार की आघाडी यापेक्षा महाडिक गट बाजी मारणार की पाटील गट याकडे लक्ष राहणार आहे.

करवीरमध्ये राहुल पाटील-चंद्रदीप नरके
करवीर विधानसभा मतदार संघात आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर त्याचे पुत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात थेट लढत होणार आहे. पी. एन. पाटील यांच्या निधनातंर राहुल पाटील यांना सहानभुती मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे चंद्रदीप नरके यांनीही जोरदार तयारी केली आहे. येथे शेकाप आणि भाजपची मते महत्त्वाची आहेत. आमदार सतेज पाटील, चेतन नरके गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे बाबा घोरपडे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, भाजपचे तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील हळदीकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राधानगरीत आबिटकर हॅट्ट्रिक करणार?
राधानगरी मतदार संघात सलग दोनवेळा बाजी मारणारे शिवसेनेचे प्रकाश आबिटकर बाजी मारणार का, याची जिल्ह्याला उत्सुकता आहे. आबिटकर यांनी विकासकामांच्या धडाक्याबरोबरच प्रचारातही आघाडी घेतली आहे. त्यांच्या विरोधातील उमेदवार ठरलेला नाही. ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणार की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे हेही स्पष्ट झालेले नाही. पण के. पी. पाटील हे महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार मानले जातात. त्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटापासून त्यांनी फारकत घेतली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. या मतदार संघात विरोधी उमेदवार कोण असणार याबरोबरच निवडणूक दुरंगी, तिरंगी की चौरंगी होणर यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

चंदगडमध्येही आघाडीच्या उमेदवाराबाबत संभ्रम
चंदगड मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यांचे लक्ष आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने गतवेळच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार शिवाजी पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीची उमेदवाराची माळ बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर की अप्पी पाटील यांच्या गळ्यात पडणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

आवाडेंविरोधात भाजप उमेदवार देणार?
इचलंकरजी मतदार संघात आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वत:ऐवजी मुलगा राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे आहे. येथे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची दावेदारी प्रबळ मानली जाते. परंतु गेली पाच वर्षे महायुतीला पाठिंबा देणाऱ्या आवाडे यांच्या मुलाच्या विरोधात भाजप आपला उमेदवार देणार का याची उत्सुकता आहे. राहुल आवाडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली आहे. पण जागा भाजपला मिळणार की शिवसेनेला मिळणार यावर पक्षाकडून लढायचे की अपक्ष हा निर्णय आवाडे घेतील. आवाडे यांच्याविरोधात एकच उमेदवार उभा करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून राहुल खंजिरे, शहराध्यक्ष संजय कांबळे, राष्ट्रवादीकडून मदन कारंडे, माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

शाहूवाडीत विनय कोरे-सत्यजित पाटील लढत
शाहूवाडी मतदार संघातून जनसुराज्यचे आमदार विनय कोरे आणि शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील अशी पारंपरिक लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघातून त्यांना आघाडी मिळाली असली तरी ती त्यांना निवडून आणण्याएवढी मोठी नव्हती. या मतदार संघात जिल्हा बँकेचे संचालक रणवीर पाटील हे सत्यजीत पाटील गटाकडे तर गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड आणि अमर पाटील कोरे गटाकडे आहेत. जिल्हा परिषद सदस्य पैलवान विजय बोरगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्यातील अस्तित्व टिकवून ठेवले असले तरी जिल्हा किंवा राज्य पातळीवरून ताकद मिळत नसल्यामुळे जनसुराज्यशी त्यांची जवळीक वाढू लागली आहे.

हातकणंगलेत आवळे विरुद्ध माने
हातकणंगले राखीव मतदार संघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सुजीत मिणचेकर यांची त्यामुळे अडचण होणार आहे. ठाकरे गटाचा त्याग करुन मिणचेकर शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. याच मतदार संघातून जनसुराज्यकडून अशोकराव माने निवडणूक लढणार आहेत. त्यांनी मतदार संघात चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

शिरोळमध्ये तिरंगी किंवा चौरंगी?
शिरोळमध्ये माजी मंत्री विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. यड्रावकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील, शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील इच्छुक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी कोणाला उमेदवार देणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. भाजपकडून गुरुदत्त शुगर साखर कारखान्याचे अध्यक्ष भगवानराव घाटगे यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे येथे तिरंगी किंवा चौरंगी लढत अपेक्षित आहे.जिल्ह्यातील दहा मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही मतदारसंघात जनसुराज्य, स्वाभिमानी शेतकरी, मनसे हे पक्ष तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत. त्यामुळे अनेक मतदार संघांत तिरंगी किंवा बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00