Home » Blog » डासांपासून होणारे आजार वाढले

डासांपासून होणारे आजार वाढले

डासांचे प्रमाण वाढून त्यातून होणारे आजारही वाढत आहेत. अमेरिकेसह जगाच्या अनेक भागांमध्ये डेंगी, ओरोपाउच, वेस्ट नाइल ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

by प्रतिनिधी
0 comments

न्यूयॉर्क

काही वर्षांमध्ये हवामानामध्ये सातत्याने बदल होत असून, या बदलांमुळे उन्हाळा आणि पावसाच्या तीव्रतेमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः युरोप आणि अमेरिकेमध्ये हा बदल आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. या प्रकारांमुळे डासांच्या माध्यमांतून प्रसार होणाऱ्या आजारांचे प्रमाणही वाढल्याचे एका संशोधनामध्ये समोर आले आहे. ऊन आणि पावसाच्या या खेळातून डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. भरपूर पाणी साचत असेल, तर डासांना अंडी घालण्यासाठी जास्त जागा मिळते. त्यातून डासांची संख्या वाढते. तर वाढत्या उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उबदार वातावरणामुळे डासांच्या संततीवाढीस मदत होत असते. त्यामुळे, डासांचे प्रमाण वाढून त्यातून होणारे आजारही वाढत आहेत. अमेरिकेसह जगाच्या अनेक भागांमध्ये डेंगी, ओरोपाउच, वेस्ट नाइल ताप यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले असून, त्यामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे, याकडे संशोधक लक्ष वेधतात. याशिवाय, चिकन गुनिया, मलेरिया या आजारांचेही प्रमाण वाढत आहे.

डेंगीचे प्रमाण वाढले
एका अभ्यासानुसार, अमेरिका आणि आशियामध्ये काही वर्षांमध्ये डेंगीच्या प्रसाराचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढले आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २०५०पर्यंत पृथ्वीवरील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये डेंगीच्या प्रसाराचा हा धोका ४० ते ५७ टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीतीही शास्त्रज्ञ व्यक्त करतात.

उपाययोजनांवर भर द्या
डासांच्या दंशापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याचे आवाहनही शास्त्रज्ञांकडून करण्यात आले आहे. यासाठी घराच्या परिसरामध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच, अंग पूर्ण झाकणारे कपडे घातले, तर डासांच्या दंशाचा धोका कमी होतो, असेही शास्त्रज्ञ सांगतात.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00