Home » Blog » PV Sindhu : सिंधू, किरण, प्रियांशू पराभूत

PV Sindhu : सिंधू, किरण, प्रियांशू पराभूत

मिश्र दुहेरीमध्ये ध्रुव-तनिशा उपांत्यपूर्व फेरीत

by प्रतिनिधी
0 comments
PV Sindhu

निंगबो : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, प्रियांशू राजावत या भारतीय बॅडमिंटनपटूंना आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. या बरोबरच या स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. (PV Sindhu)

महिला एकेरीमध्ये भारताच्या केवळ सिंधूलाच दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्यात यश आले होते. या फेरीत मात्र जपानच्या तृतीय मानांकित अकाने यामागुचीने सिंधूचा २१-१२, १६-२१, २१-१६ असा पराभव केला. हा सामना १ तास ६ मिनिटे रंगला. यामागुचीने पहिला गेम जिंकून सामन्यात आघाडी घेतल्यानंतर सिंधूने दुसरा गेम २१-१६ असा जिंकून बरोबरी साधली होती. निर्णायक गेममध्ये मात्र यामागुचीने सिंधूपेक्षा सरस खेळ केला. सिंधूचा हा या वर्षीचा पाचवा पराभव ठरला. या वर्षी सिंधूला केवळ तीन विजय मिळवता आले आहेत. पुरुष एकेरीमध्ये थायलंडच्या तृतीय मानांकित कुनलावत वितिदसार्नने किरण जॉर्जला १९-२१, २१-१३, २१-१६ असे पराभूत केले. तब्बल सव्वा तास रंगलेल्या या सामन्यात किरणने पहिला गेम जिंकून आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या दोन गेममध्ये मात्र त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. अन्य सामन्यात जपानच्या पाचव्या मानांकित कोदाई नाराओकाने प्रियांशूवर ४३ मिनिटांत २१-१४, २१-१७ अशी मात केली. (PV Sindhu)

ध्रुव-तनिशा उपांत्यपूर्व फेरीत

मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत ध्रुव-तनिशाने तैपेईच्या हाँग वेई ये-निकोल चॅन जोडीला तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात १२-२१, २१-१६, २१-१८ असे नमवले. ५० मिनिटे रंगलेल्या या सामन्यामध्ये पहिला गेम गमावल्यामुळे ध्रुव-तनिशा पिछाडीवर होते. मात्र, पुढील लागोपाठ दोन गेम जिंकत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. उपांत्यपूर्व फेरीत ध्रुव-तनिशा जोडीसमोर हाँगकाँगच्या पाचव्या मानांकित चुन मॅन तांग-यिंग सुएत से यांचे खडतर आव्हान आहे. याच गटामध्ये भारताच्या आशित सूर्या-अमृता प्रमुथेश यांना चीनच्या अग्रमानांकित झेन बांग जिआंग-याशिन वेई यांच्याकडून ११-२१, १४-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीत मलेशियाच्या सहाव्या मानांकित ॲरन चिया-वूई यिक सोह यांनी भारताच्या हरिहरन अम्साकरुणन-रुबनकुमार रेठीनासबापती यांना २१-१५, २१-१४ असे हरवले.
हेही वाचा :  
सहा संघांमध्ये रंगणार ऑलिंपिक क्रिकेट
विराट कोहली १३,००० पार

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00