Home » Blog » Records : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यात विक्रमांना गवसणी

Records : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यात विक्रमांना गवसणी

सर्वोच्च सांघिक, वैयक्तिक धावसंख्या; वेगवान शतकाशी बरोबरी

by प्रतिनिधी
0 comments
Records

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या ‘ग्रुप बी’मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ५ विकेट राखून विजय मिळवला. साडेतीनशे धावांपेक्षा अधिकचे आव्हान यशस्वीरीत्या पार करताना ऑस्ट्रेलियाने या सामन्यात काही नवे विक्रमही प्रस्थापित केले. अशाच काही महत्त्वाच्या विक्रमांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप. (Records)
५ बाद ३५६ – वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या वन-डे स्पर्धांमध्ये प्रथमच साडेतीनशेपेक्षा अधिक आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग करण्यात आला. यापूर्वी, सर्वांत मोठ्या आव्हानाच्या यशस्वी पाठलागाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये पाकने श्रीलंकेचे ३४५ धावांचे आव्हान ४ विकेटच्या मोबदल्यात पार केले होते. (Records)
३५१, ३५६ – चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम या सामन्यात दोनवेळा मोडण्यात आला. प्रथम इंग्लंडने ८ बाद ३५१ धावा करून न्यूझीलंडचा २१ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. न्यूझीलंडने २००४ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अमेरिकेविरुद्ध ४ बाद ३४७ धावा केल्या होत्या. परंतु, इंग्लंडचा हा विक्रम फार काळ टिकला नाही. ऑस्ट्रेलियाने ५ बाद ३५६ धावा करून इंग्लंडच्या विक्रमालाही मागे टाकले. (Records)
१६५ – इंग्लंडच्या बेन डकेटने या सामन्यात १४३ चेंडूंत १६५ धावांची खेळी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ही डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्याने न्यूझीलंडचा नॅथन ॲस्टल आणि झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर यांना मागे टाकले. या दोघांनी प्रत्येकी १४५ धावा केल्या होत्या. ॲस्टलने २००४मध्ये अमेरिकेविरुद्ध १५१ चेंडूंत नाबाद १४५, तर फ्लॉवरने २००२मध्ये भारताविरुद्ध १६४ चेंडूंमध्ये १४५ धावांची खेळी केली होती.(Records)
७७ – या सामन्यात नाबाद १२० धावा फटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या जोश इंग्लिसने ७७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वांत वेगवान शतकाच्या भारताच्या वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली. सेहवागने २००२च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडविरुद्ध १०४ चेंडूंमध्ये १२६ धावांची खेळी करताना ७७ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

हेही वाचा :

भारतीय महिलांची जर्मनीवर मात

भारत-पाक सामन्यांचा आजवरचा इतिहास

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00