मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले. यूनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे उभारण्यात आलेल्या भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास मंत्री ॲड.शेलार यांनी अभिवादन केले.
दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी ११ जुलै २०२५ रोजी, यूनेस्कोच्या ४७ व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पॅरिस येथे स्वीकारले. (World Heritage Certificate for Shivaji-era forts from UNESCO)
छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा १२ किल्ल्यांचा समूह “जागतिक वारसा स्थळ” म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये मंत्री ॲड. शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र मिळाले आहे. (World Heritage Certificate for Shivaji-era forts from UNESCO)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान स्वीकारताना आज ऊर भरून आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन आणि परिश्रम तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या योगदानाबद्दल मंत्री ॲड. शेलार यांनी आभार मानले आहेत. भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांनीही परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचेही तमाम महाराष्ट्रातर्फे मंत्री ॲड.शेलार यांनी आभार मानले. तसेच हा महाराष्ट्रासाठी, देशासाठी शिवप्रेमींसाठी गौरवाचा क्षण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (World Heritage Certificate for Shivaji-era forts from UNESCO)
भारत संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला असून, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मुलभूत ध्येयाशी सुसंगत आहे. पॅरिसमधील त्यांच्या या स्मारकाला मंत्री शेलार यांनी अभिवादन केले. यावेळी विशाल शर्मा यांच्यासह विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक हेमंत दळवी आणि मान्यवर उपस्थित होते. (World Heritage Certificate for Shivaji-era forts from UNESCO)